सातारा (प्रतिनिधी संतोष मोरे) : तलवारीने हल्ला आणि बंदुकीतून गोळीबार करत चौघांनी सोने-चांदी व्यावसायिकाचे ५० तोळे सोने, ४० किलो चांदी आणि ७ लाखांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील मलवडी (ता. माण) येथे घडली आहे. या घटनेतील एका संशयिताला पकडण्यात पोलिसांना यश आले असून लुटारूंच्या हल्ल्यात व्यावसायिकासह त्यांचा पुतण्या जखमी झाला आहे.
मलवडी येथील बसस्थानक परिसरात श्रीकांत तुकाराम कदम यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी साडे सातच्या सुमारास दुकानातील ४০ तोळे सोने, ५০ किलो चांदी आणि रोख ७ लाख रुपये असा ऐवज तीन पिशव्यांमध्ये भरून ते दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम याच्यासोबत घरी निघाले होते. पावणे आठच्या सुमारास अचानक एक जण गाडीसमोर आला. संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले. त्यांनी श्रीजितला जोरात धक्का दिल्यामुळे श्रीकांतचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली. गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या घेऊन तिघे जण त्यांच्या दुचाकीकडे पळाले, तर एकाने तलवारीने श्रीजितच्या हातावर आणि श्रीकांत यांच्या खांद्यावर वार केला. त्या अवस्थेतही चुलत्या-पुतण्यांनी एका संशयिताला पकडून ठेवत आरडाओरडा केला.
एक साथीदार परत आला नसल्याचे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला. त्याने बंदुकीतून चार गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकविताना त्यातील एक गोळी श्रीकांत यांनी पकडून ठेवलेल्या संशयिताच्या पाठीला चाटून गेली. ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पकडलेल्या चोरट्यावर प्राथमिक उपचार करून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अप्पर पोलीस अथीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक गणेश किंद्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. उर्वरित संशयितांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले आहे.