एमआयडीसीतील अतिक्रमण न काढल्यास शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

Farmers-warned-of-self-immolation-if-encroachment-in-MIDC-is-not-removed

एक महिन्यात रस्ता मोकळा करून देण्याची मागणी

वाई (तालुका क्राइम रिपोर्टर दीपक सावंत) : येथील औद्योगिक वसाहत भूखंड क्र.डी/२८-३ या जागेच्या दक्षिण बाजूकडील रस्त्यावर खाजगी मालकाने वाहनाचे शेड, गवताची गंज व झाडे लावून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या शेतरस्त्याचा वापर स्थानिक शेतकऱ्यांना करता येत नाही. हे अतिक्रमण त्वरित काढून रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा सामूहिक आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा या परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई येथील ग्रामीण गट क्र. २२८ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने मास्टर प्लॅन मधील नकाशात ४ मीटरचा रस्ता महामंडळाचे हद्दीपर्यंत ठेवला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी रस्ता दाखवूनही हा खाजगी मालक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत आहे. या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना हे कुटुंबीय गुंडगिरीतून दमदाटी व मारहाण करतात. याबाबत अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र शासकीय दिरंगाईचा गैरफायदा घेत शासकीय पुढाऱ्यांचा आसरा घेऊन खाजगी मालक शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता अडवून ठेवत आहे. लगतच्या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, ऊस तोडणी कामगारांना, मेंढपाळांना इकडून हाकलून लावणे असे प्रकारे कुटुंब करीत आहेत. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना गुंडगिरीद्वारे कुटुंब मारहाण करते असे शेतकऱ्यांनी सांगितले.

एमआयडीसी अधिकाऱ्यांनी हा रस्ता मोकळा करण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न केला. परंतु, राजकीय दबामुळे व कुटुंबाच्या अरेरावीमुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. महसूल विभाग, पोलीस प्रशासन व औद्योगिक महामंडळाने संयुक्त कारवाई करून हा रस्ता मोकळा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या रस्त्याची जागा १९८५ मध्ये संपादित झाली असून तेव्हापासून ही जागा खाजगी लोक वापरत आहेत. गरवारे कंपनीने २००८ मध्ये रस्त्याची ४ मीटर जागा सोडून कंपाऊंड केले. मात्र, संबंधित लोक कंपाउंडच्या ४ मीटर रस्त्याची जागाही अडवून ठेवत आहेत. त्यांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक सहकार्य करत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण शासकीय अधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत त्वरित काढावी अन्यथा शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारा देविदास पेटकर, बाळासाहेब पेटकर, विलास पेटकर, मल्हारी पेटकर, संदीप पेटकर आधी शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here