श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात दानपेट्यांमध्‍ये खोटे दागिनेही अर्पण; चौकशी करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

Fake-ornaments-are-also-offered-in-donation-boxes-at-Shri-Vitthal-Rukmini-Temple

माळशिरस (तालुका प्रतिनिधी विनोद लोखंडे) : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. या प्रकरणी मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केला असण्याची शक्यता लक्षात घेता, या प्रकरणाची शासनाने एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून सखोल आणि निःष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

 

याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. पवार यांनी निवेदन पुढे पाठवले जाईल, असे आश्वासन हिंदु जनजागृती समितीचे राजन बुनगे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे, हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे, प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे, मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे, मंदिरातील गोधन कसायांना विकणे, ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने २००० ते २०१० या कालावधीत मंदिराला ४७ लाख ९७ हजार ७१६ रुपयांचा तोटा होणे, आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोते भरून खोटे दागिने सापडणे या प्रकरणातही काळेबेरे असू शकते.

 

भाविक सराफाकडून देवासाठी दागिने तयार करून घेतात. तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा. असे पुन्हा कोणाला करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करताना ते खरे आहेत कि खोटे आहेत, हे लगेच पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था अद्याप का निर्माण करण्यात आली नाही. यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे हेच दर्शवते. मंदिर सरकारीकरणाचे हे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here