जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. तृणधान्याचे आहारातील महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी व त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करण्यासाठी नवजीवन प्लसमध्ये खास सुरु करण्यात आलेल्या ग्रोशो फ्लेक्ससह विविध गुणवत्तापूर्ण तृणधान्यांचा समावेश असलेल्या विभागाचे गुरुवार (दि.१९) जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांशी बोलतांना ते म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश आहे. आजकालची तरुण पिढी आरोग्यदायी खाणे व राहणे यावर लक्ष केंद्रित करत आहे. तृणधान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तंतुमय पदार्थ असल्यामुळे याकडे लोकं ‘सुपरफूड’ म्हणून पाहू लागले आहेत. बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर,राजगिरा यासारखे पौष्टिक तृणधान्ये ही कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांनी समृद्ध आहेत. त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करुन निरोगी व सुदृढतेकडे आपली वाटचाल निश्चितच होवू शकते.
यावेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यासह कृषी विभागाचे संचालक विकास पाटील, मिलेट्स मिशन महाराष्ट्र स्टेट कृषी विभागाचे जॉइंट डायरेक्टर मोहन वाघ, श्री. ठाकूर, अनिल भोकरे व नवजीवन प्लस चे अनिल कांकरिया उपस्थित होते. यावेळी नवजीवन प्लसमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध ग्रोशो तृणधान्य फ्लेक्ससह गुणवत्तापूर्ण तृणधान्यांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नवजीवन प्लस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.







