ज्येष्ठ अभिनेता, रंगकर्मी व निर्माते अंबर कोठारे यांचे निधन

ambar-kothare

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ज्येष्ठ अभिनेता, रंगकर्मी व निर्माते अंबर कोठारे यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील एक तारा निखळला आहे. त्यांची नातसून उर्मिला कोठारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहून निधनाची बातमी दिली.

 

https://www.facebook.com/urmillakothare/posts/pfbid0qQ1KA8hkEehzqoMtymXZ4236abV8wZ2G6GxJwvEFfHBYXYb6L5dYqvpQ4pxut2awl

 

उर्मिला कोठारे यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ‘स्व. श्री. अंबर कोठारे (१४.०४.१९२६ – २१.०१.२०२३) – संपूर्ण कोठारे फॅमिलीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिर:शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.’ हीच पोस्ट महेश कोठारे यांनीही शेअर केली आहे. निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. महेश कोठारेंच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये रंगकर्मी, सहकलाकार, निर्माते, दिग्दर्शकांसह चाहते आपल्या सहवेदना व्यक्त करत आहेत. महेश कोठारेंच्या यशासाठी सतत धडपडणारा एक सच्चा कलावंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

अंबर कोठारे यांचा जन्म १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत झाला होता. अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनंतर त्यांनी ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट या बँकेत तब्बल ४० वर्षे नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी आपल्यातील कलावंताला जागरुक ठेवले. अनेक नाटकातून दमदार भूमिका ते साकारत राहिले. इंडियन नॅशनल थिएटर्स यां संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सेक्रेटरी होते. याकाळात त्यांचे झोपी गेलेला जागा झाला हे नाटक रंगभूमीवर गाजले. त्याचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रात झाले. झुंझारराव या नाटकातील भूमिकेमुळे ते प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत असत. त्यानंतर त्यांनी नाट्य निर्मितीही पुढाकार घेतला. जेथे जातो तेथे हे नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. या नाटकाची स्क्रिप्ट त्यानी दत्ता भट्ट यांच्याकडून लिहून घेतली होती. या नाटकामध्ये दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.

 

महेश कोठारे यांच्या बालकलाकार ते निर्माता, अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला धुमधडाका हा चित्रपट यशस्वी करण्यात करण्यात व त्याच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी महेश कोठारेंच्या चित्रपटात अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. चरित्र अभिनेत्यासोबतच त्यांनी क्रूर खलनायकही पडद्यावर साकारला. त्यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here