बीजिंग (चीन) : कोरोना संसर्गामुळे चीनची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. चीनमध्ये एका आठवड्यात १३ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. चीनच्या महामारीशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की सुमारे ८० टक्के चीनी नागरिक आधीच विषाणूच्या विळख्यात आले आहेत, त्यामुळे नजीकच्या भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता नाही.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने रविवारी सांगितले की, १३ ते १९ जानेवारी या सात दिवसांत रुग्णालयांमध्ये कोविड-१९ मुळे मृतांची संख्या १२,६५८ वर पोहोचली आहे. झिरो कोविड पॉलिसी अचानक मागे घेतलल्यानंतर ८ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान चीनमध्ये सुमारे ६०,००० मृत्यू झाले.
सीडीसीचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू झुयू यांनी पुढील काही महिन्यांत दुसर्या लाटेचा संभाव्य धोका नाकारला आहे, तर वृद्ध आणि असुरक्षित लोकांना चंद्र नववर्षादरम्यान सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वू यांनी शनिवारी चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर लिहिले, “चीनी नववर्षादरम्यान लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रवासामुळे काही प्रमाणात साथीच्या रोगाचा प्रसार वाढू शकतो आणि काही भागात संक्रमित लोकांची संख्या वाढू शकते.” वू म्हणाले की नवीन लाटेने देशातील सुमारे ८० टक्के लोकांना संक्रमित केले आहे, येत्या दोन ते तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणात उद्रेक किंवा दुसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे.







