व्हिडीओच्या वापराने काँग्रेस नेत्याच्या मुलाला हनीट्रॅप; तरुणीने लुबाडले १२ लाख

honey-trap
file photo

उज्जैन (मध्यप्रदेश) : येथील दिवंगत काँग्रेस नेत्याचा मुलगा हनीट्रॅपमध्ये अडकला आहे. मॉडेलिंग करणाऱ्या तरुणीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले. तरुणीने व्हिडीओचा वापर करून त्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून १२ लाख रुपये उकळले. या प्रकरणी विजय नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणीविरोधात ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


विजयनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनमधील काँग्रेसचे माजी नगरसेवक दिवंगद टीकाराम टाटावत यांचा मुलगा महेश टाटावत हनीट्रॅपमध्ये अडकला आहे. महेश याची चार वर्षांपूर्वी इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर तरुणीने त्याला हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि फसवणूक करून व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडून लाखोंची रक्कम उकळली. मात्र तरुणी वारंवार पैशाची मागणी करत असल्याने अखेर काँग्रेस नेत्याच्या मुलाने थेट पोलीस स्थानक गाठले आणि तक्रार दाखल केली.

मधल्या काळात तरुणीने महेशकडून १२ लाख रुपयेही उकळले. मात्र आता तरुणी अधिक पैशाची मागणी करत असल्याने आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे महेशने सांगितले. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी तरुणी आणि तिच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सदर तरुणी मॉडेल असून हॉटेल आणि पबमध्ये पार्टी, नशा करण्यासाठी जात होती. तसेच आपल्यालाही ती पबमध्ये घेऊन जात होती, परंतु आत न नेता बाहेरच उभी करत होती, असेही महेशने सांगितले. तिच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आपण आत्महत्येचाही विचार केल्याचे महेशने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here