जळगाव (एरंडोल प्रतिनिधी वाल्मिक सोनवणे) : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव यांच्या निर्घृण हत्याप्रकरणी व विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आज (दि.१३ जून) रोजी तीव्र निदर्शन व आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले. ज्यामध्ये असंख्य वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक १ जून 2023 रोजी बोंढार हवेली येथील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी असलेल्या अक्षय भालेराव यांची गावातील गावगुंड यांनी पोटात चाकू खुपसून निर्घृणपणे हत्या केली आहे. सदरील हत्या जातीय द्वेष भावनेने झालेली असून या भागात अनेक वेळा याच पद्धतीने हल्ले बौद्ध व इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक समुदायावर होत आहे. नांदेड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत असून नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीने हौदोस घातला आहे. भविष्यात अक्षय भालेराव सारख्या घटना पुन्हा घडू नये. यासाठी या गुन्ह्यातील आरोपींना कडक शासन होणे गरजेचे असून सदरील घटनेचा तपास तात्काळ करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून गुन्हेगारांना कडक शासन होईल या पद्धतीने सबळ पुराव्यासह आरोपपत्र दाखल करण्यात यावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
दुसरी घटना ही हदगाव तालुक्यातील मौ.वाळकी (खु.) येथील आहे. या गावातील मातंग समाज गेल्या दोन वर्षांपासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात. या गावात बौध्द समाज नसतांनाही येथील मातंग समाज भिमजयंती साजरी करतो, ही बाब जातीयवादी मंडळींना अस्वस्थ करत होती. या जातीद्वेषाने भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून मातंग वस्तीवर रात्रीच्यावेळी सामूहिक जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. तसेच या गावातील मातंग समाजातील १५ – १६ तरुणांवर दरोड्याचा खोटा गुन्हा नोंदवून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे.
तिसरी घटना ही लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात अत्यंत क्रूर व मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गिरीधर तबघाले या मातंग समाजातील तरुणाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये १० टक्के व्याजदराने घेतले होते. तीन हजाराच्या बदल्यात २० हजार रुपये वसूल केले तरीही हा सावकार त्याच्यावर बाकी दाखवत होता. पैसेवसुलीसाठी भर बाजारात त्याला काठीने मारहाण केली. या प्रकरणी तक्रार देण्यासाठी तबघाले रेणापूर पोलीस ठाण्यात गेले असता, त्यांची तक्रारही नोंदवून घेतली नाही. त्यामुळे या सावकाराचे बळ वाढले आणि त्याने तबघाले यांच्या घरावर हल्ला करत डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती तर मातंग बांधवाचा जीव वाचला असता.
चौथी घटना ही मुंबईतील चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात १९ वर्षीय बौध्द मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मंत्रालयाशेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी अशी घटना घडणे म्हणजे राज्याची कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे लक्षण आहे. या सर्व घटनांवरून महाराष्ट्रातील मातंग व बौध्द समाज हा या जातीयवादी मंडळींच्या हल्ल्याचा, अत्याचाराची शिकार होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या निवेदनात नांदेड जिल्ह्यातील घटनांमध्ये जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून अत्याचारी लोकांचा बंदोबस्त करावा. दोन्ही गावातील घटनांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करून, जलदगतीने तपास करावा. नांदेड जिल्हाधिकारी व परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर तातडीने बैठक घेऊन जिल्ह्यात ॲट्रॉसिटी ॲक्टची कठोर अंमलबजावणी करावी. तसेच खोटे गुन्हे नो्दविण्याच्या वस्तुस्थितीचा आढावा घ्यावा, नांदेड, लातूरसह मुंबई व अन्य ठिकाणी घडलेली प्रकरणे संवेदनशील असल्याने ही प्रकरणे जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कडक शासन करण्यात यावे, पिडीत कुटुंबांना तात्काळ ५० लाखांची आर्थिक मदत करण्यात यावी, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, जातीय अत्याचाराची प्रकरणे झालेल्या गावात अल्पसंख्य बौध्द व इतर मागासवर्गीय समाजाताल दीर्घकाळ पोलीस संरक्षण द्यावे, हदगाव तालुक्यातील बालकी या गावातील मातंग समाजातील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, रेणापूर तालुक्यातील पिडीत मातंग व्यक्तीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या पोलिसांवरदेखील गुन्हे दाखल करावेत. सावित्रीबाई फुले वसतिगृह, चर्चगेट येथे घडलेल्या तरुणीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात संशयित आरोपींचे डीएनए आणि फिंगरप्रिंट तपासून घ्यावे. अंधारे व कडू या दोन वॉर्डनची या प्रकरणी चौकशी करावी., मुंबई व महाराष्ट्रातील सर्व वसतिगृहांच्या सुरक्षेचे दरवर्षी ऑडीट करण्यात यावे, नागपूर पोलिसांच्या एसआयटीने ज्या भागात दंगली होणार आहेत, त्या भागांची नावे सरकारला कळविली आहेत. ती ठिकाणे जाहीर करून नागरिकांमध्ये जागरुकता आणावी, जेणेकरुन कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा प्रभारी ॲड.रविकांत वाघ, युवा रा.का.सदस्य महाराष्ट्र राज्य शमीभा पाटील, तालुकाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हाध्यक्ष महिला सरिता साळुंके, युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, उपजिल्हाध्यक्ष भगवान धनगर, महानगरप्रमुख ललिचा घोगले, जिल्हा युवा प्रसिध्दी प्रमुख राहुल सुरवाडे, तालुकाध्यक्ष पाचोरा विशाल बागूल, तालुकाध्यक्ष अमळनेर दाजिबा गव्हाणे, तालुकाध्यक्ष चाळीसगाव विलास चव्हाण, युवा महानगरप्रमुख मनोज अडकमोल, शहराध्यक्ष चाळीसगाव सागर निकम, तालुकाध्यक्ष पारोळा गौतम पवार, युवा तालुकाध्यक्ष गुलाब कोळी, महानगर सचिव रविंद्र पाटील, महानगर संघटक खंडू महाले, युवा महानगर सचिव जोशी, युवा महानगर संघटक किरण शमी, सोशल मिडीया प्रमुख राहुल भालेराव, उपतालुकाध्यक्ष अनिल मोरे, सहसचिव विजय मोरे, तुषार मोरे, नानासाहेब धनशोर, जिभाऊ आयरे, विशाल मोरे, अमोल राठोड, वाल्मिक सोनवणे, जगदीश पवार, पृथ्वीराज शिरसाठ, देविदास पवार, दिपक सोनवणे, शरद धनगड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







