जळगाव (जिल्हा प्रतिनिधी शेख जावीद) | आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या सुविधेचा गैरवापर करून पोलिसांना खोटी माहिती देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) पोलीस स्टेशनच्या हद्दीत मद्यधुंद अवस्थेत एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
“आपत्कालीन यंत्रणेचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई होईल!”
“नागरिकांनी ‘डायल ११२’ या आपत्कालीन सेवा क्रमांकाचा वापर केवळ वास्तविक आणि तातडीच्या मदतीसाठीच करावा. पोलिसांना खोटी माहिती देणे, दिशाभूल करणे किंवा आपत्कालीन यंत्रणेचा विनाकारण गैरवापर करणे हा कायद्याने दंडनीय अपराध आहे. अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध पोलीस प्रशासन अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करेल.”
— कल्याणी वर्मा (प्रभारी अधिकारी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन)
३ जून रोजी सायंकाळी ७ वाजून ४८ मिनिटांच्या सुमारास ‘डायल ११२’ च्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने पिंपळगाव बुद्रुक येथील ‘जितेंद्र किराणा अँड जनरल स्टोअर्स’ परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून, तातडीने मदत न मिळाल्यास स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याची खळबळजनक माहिती दिली.
माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पथक अत्यंत तत्परतेने तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरात सखोल चौकशी केली असता, अपहरणाची अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे समोर आले. यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला, पण नियंत्रण कक्षाला आलेला कॉल खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित मोबाईल धारकाचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने मद्यधुंद (दारूच्या) नशेत ‘डायल ११२’ वर कॉल करून ही चुकीची माहिती दिल्याची कबुली दिली. पोलीस यंत्रणेला विनाकारण त्रास व्हावा आणि शासकीय मनुष्यबळ तसेच वेळेचा अपव्यय व्हावा, याच उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी विजय आत्माराम जगताप (वय ४० वर्षे, रा. पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २१७ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ (१) अन्वये पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.







