ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; हत्येतील आरोपींना २४ तासांच्या आत पनवेल रेल्वे स्टेशनवरून अटक

ठाणे पोलिसांची

ठाणे (उपसंपादक प्रकाश कदम) । पोखरण रोड परिसरात झालेल्या एका इसमाच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना ठाणे गुन्हे शाखा (वागळे युनिट-५) च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत आरोपींना पनवेल रेल्वे स्टेशनवरून गोरखपूर एक्सप्रेसमधून पळून जात असताना ताब्यात घेतले.

दिनांक ०५ जून २०२६ रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोड नंबर २ येथील हनुमान मंदिराजवळ, ठाणे (पश्चिम) येथे काही अज्ञात इसमांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा, वागळे युनिट-५ कडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) मदतीने, दोन्ही आरोपी पनवेल रेल्वे स्टेशनवरून गोरखपूर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-५ च्या पथकाने तत्काळ हालचाली करत रेल्वेमधून आरोपींचा गुप्त पद्धतीने पाठलाग सुरू केला. अखेर सायंकाळी १८.४५ वाजताच्या सुमारास कसारा रेल्वे स्टेशन येथे दोन मुख्य आरोपींसह त्यांच्यासोबत असलेल्या इतर १३ संशयीत इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले अजय देवकीलाल गिरी (वय २८ वर्ष, रा. कटकुईया, पो. वंशापुर्वा, ता. हळदी, जि. बहराइच, उत्तर प्रदेश), शिवा संजय गोस्वामी (वय २५ वर्ष, रा. नारायणपुर कला, पो. कटकुईया, ता. नानपुरा, जि. बहराइच, उत्तर प्रदेश) हे दोघे आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास वर्तकनगर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस सह आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा / अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा) पराग मणेरे, आणि सहायक पोलीस आयुक्त (शोध १ गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, महिला पोलीस निरीक्षक पल्लवी ढगेपाटील, श्रेणी उपनिरीक्षक सुनिल अहिरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, पोलीस नाईक (७१५९) तेजस ठाणेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल (८०३३) मिनीनाथ शिकारे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.ठाणे पोलिसांची

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here