भडगाव (प्रतिनिधी आमीन पिंजारी) | तालुक्यातील कजगावजवळील कनाशी–कजगाव रस्त्यालगत गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतुकीचा प्रकार खुलेआम सुरू असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. दिवसाढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले जात असून, ट्रॅक्टरद्वारे त्याची वाहतूकही बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे. कजगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिज चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सर्वसामान्यांच्या नजरेसमोर घडत असतानाही महसूल व संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. तसेच यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. या अवैध व्यवसायाला प्रशासनाचे अप्रत्यक्ष अभय मिळत आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
यासंदर्भात लोणपिराचे येथील तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता, “या प्रकरणाची आम्हाला कोणतीही माहिती नाही. तसेच कोणालाही गौण खनिज वाहतुकीचा परवाना देण्यात आलेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्षात जमिनीवर सुरू असलेले उत्खनन व वाहतूक पाहता महसूल प्रशासनाच्या या दाव्यांवर आणि गस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळी पाहणी करून या अवैध उत्खनन करणाऱ्यांवर व वाहतूक करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात स्थानिक नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.







