साई आश्रम प्रसादालय परिसरात सापडलेली मोबाईल व रोख रक्कमेची बॅग सुरक्षा रक्षकाने प्रामाणिकपणे केली परत

साई आश्रम

शिर्डी (प्रतिनिधी तुषार महाजन) | श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथे दररोज देश-विदेशातून लाखो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संस्थानचे सुरक्षा कर्मचारी सतत दक्ष राहून आपली जबाबदारी पार पाडत असतात. अशाच दक्षता आणि प्रामाणिकतेचा आदर्श दाखवणारी घटना नुकतीच साई आश्रम येथील प्रसादालय परिसरात घडली आहे.

साई आश्रम प्रसादालय परिसरात सुरक्षा रक्षक श्री. सोमनाथ कसबे हे नियमित राऊंड घेत असताना त्यांना एक बेवारस बॅग आढळून आली. त्यांनी तत्काळ सदर बॅग ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता, त्यामध्ये OPPO कंपनीचा मोबाईल फोन तसेच रोख रक्कम रुपये ११,७५०/- मिळून आली. बॅगमध्ये मौल्यवान वस्तू व रक्कम असल्याचे लक्षात येताच श्री. कसबे यांनी कोणताही विलंब न करता ती बॅग प्रामाणिकपणे संरक्षण कार्यालयात जमा केली.
यानंतर संरक्षण कार्यालयामार्फत योग्य ती चौकशी करण्यात आली. चौकशीत सदर बॅग झारखंड येथील साईभक्त श्री. अमरजीत कुमार भारती यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आवश्यक खात्री करून OPPO मोबाईल फोन व रोख रक्कम रुपये ११,७५०/- ही बॅगधारक साईभक्ताकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली. हरवलेली बॅग व रक्कम परत मिळाल्याने संबंधित साईभक्तांनी संस्थान प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत साईबाबा समाधी मंदिराच्या गाभाऱ्यात सुरक्षा कर्मचारी श्री. जालिंदर बोर्डे यांना रुपये ४,२००/- रोख रक्कम सापडली. त्यांनीही सदर रक्कम प्रामाणिकपणे कार्यालयात जमा केली. या दोन्ही घटनांमधून श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा, सजगता आणि प्रामाणिकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. सुरक्षा कर्मचारी श्री. सोमनाथ कसबे आणि श्री. जालिंदर बोर्डे यांनी दाखवलेल्या या प्रेरणादायी प्रामाणिकतेबद्दल पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी सर यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here