जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पाचोरा-भडगावात वाळू माफियांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’; २ डंपर जप्त!

वाळू माफियां
पाचोरा येथील कारवाई: कुरंगी येथील अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर नांद्रा येथून पकडून पाचोरा तहसीलदार कार्यालयात जमा करताना राहुल पवार (मंडळ अधिकारी, नगरदेवळा), कुणाल कोळी (मंडळ अधिकारी, भडगाव) आणि ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, तात्याराव सपकाळ, समाधान हुलहुळे आदी.

प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या विशेष टास्क फोर्सची धडक मोहीम; अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले

जळगाव (प्रतिनिधी शेख जावीद) | जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष आदेशानुसार पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने अत्यंत मोठी आणि कडक मोहीम हाती घेतली आहे. उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) श्री. भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्स पथकांनी धडक कारवाई करत अवैध वाळूची वाहतूक करणारे २ मोठे डंपर रंगेहात पकडून जप्त केले आहेत. ही सर्व वाहने पुढील कायदेशीर कारवाईसाठी पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.

विशेष टास्क फोर्स पथक क्रमांक १ ने भडगाव तालुक्यातील वाक शिवारात सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे एक डंपर जप्त केले. या कारवाईत परधाडेचे मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, कुऱ्हाडचे मंडळ अधिकारी भरत नन्नावरे, ग्राम महसूल अधिकारी नकुल काळकर, अतुल पाटील, शिवाजी डोंगरे, प्रदीप काळे, एल. बी. हिंगे, अमोल शिंदे आणि गुणवंत पाटील यांच्या पथकाने ही महत्त्वाची कामगिरी बजावली.
५ जून २०२६ रोजी विशेष टास्क फोर्स पथक क्रमांक २ ने दुसरी मोठी कारवाई केली. मौजे कुरंगी (ता. पाचोरा) येथील एक अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर नांद्रा परिसरातून जात असताना पथकाने त्याला अटकाव केला. आवश्यक कागदपत्रे आणि रॉयल्टी नसल्याने हे डंपर जागीच जप्त करण्यात आले. या पथकात नगरदेवळा मंडळ अधिकारी राहुल पवार, भडगाव मंडळ अधिकारी कुणाल कोळी, ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, प्रशांत कुंभारे, तात्याराव सपकाळ आणि समाधान हुलहुळे यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पाचोरा व भडगाव तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. क्षेत्रात महसूल विभागाची रात्रीची व दिवसाची गस्त वाढवण्यात आली असून, शासकीय महसूल बुडवून नैसर्गिक संपत्तीची चोरी करणाऱ्यांवर यापुढेही थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे.

वाळू माफिया
वाक येथील कारवाई: पाचोरा-भडगावचे प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या विशेष पथकाकडून वाक (ता. भडगाव) येथे अवैध डंपरवर कारवाई करताना मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, भरत नन्नावरे, नकुल काळकर, अतुल पाटील, शिवाजी डोंगरे, प्रदीप काळे, एल. बी. हिंगे, अमोल शिंदे, गुणवंत पाटील आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here