सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच मोहिमेंतर्गत काल, दिनांक ५ जून २०२६ रोजी सकाळी बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धडक धाडी टाकून अवैध हातभट्टी दारू तयार करण्याचे अडे उद्ध्वस्त केले. या धडक कारवाईत पोलिसांनी एकूण ३८ हजार ५०० रुपये किमतीचे ६५० लिटर गुळमिश्रित रसायन आणि ६० लिटर तयार हातभट्टी दारू जप्त केली आहे.
सकाळी ७:१० वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीवरून नाळे प्लॉट येथील एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला छापा टाकण्यात आला. तेथे लता धनु पवार (वय ६५, रा. नाळे प्लॉट, बार्शी) ही महिला बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारूचे रसायन तयार करताना मिळून आली. तिच्याकडून ६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने गायकवाड पट्टी येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुनिता राजू पवार (वय ३०) आणि मिना दीपक पवार (वय ३५, दोन्ही रा. गायकवाड पट्टी, बार्शी) या दोन महिलांना महिला पोलिसांच्या मदतीने रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण १९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पारधी कॅम्प येथे टाकलेल्या छाप्यात आप्पा लग्मान काळे (वय ३७, रा. सोलापूर रोड, बार्शी) हा प्लास्टिक बॅरलमध्ये हातभट्टी दारूचे रसायन ढवळताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून १७,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
जप्त करण्यात आलेली हातभट्टीची दारू व गुळमिश्रित सडलेले रसायन मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याने, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सदर सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच ओतून नष्ट करण्यात आला. रासायनिक विश्लेषणासाठी (Chemical Analysis) नमुने सील करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हिशन ॲक्ट अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले असून, पुढील तपास पोहेकॉ लाड आणि पोना जाधव करीत आहेत.
ही कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणजणकुमार शर्मा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि बार्शीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.







