मुंबई (संपादक सुनिल पाटील) । रविवारी (दि.११ जून) रोजी घाटकोपर येथील पी.एन.दोशी ऑडिटोरियममध्ये एमसीपीतर्फे आर.डी.बर्मन व बप्पी लहरी यांच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. दरवर्षी एमसीपी या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजासाठी आणि कलेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येते. यावर्षीचा समाजरत्न पुरस्कार ऑल इंडिया एम्पलॉई असोसिएशनचे डॉ.गोरक्ष धोत्रे यांना समाजरत्न तर संगीत संयोजक व ॲकॉर्डियन प्लेअर नंदकुमार केरकर यांना संगीतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हे पुरस्कार वितरण प्रसिध्द उद्योगपती, समाजसेवक राजाभाई मीराणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पुरस्कारार्थीं डॉ.गोरक्ष धोत्रे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, सामाजिक कल्याणाचा प्रचार आणि समाजाच्या उन्नतीसाठी आमच्या प्रयत्नांना हा पुरस्कार मिळणे हा एक मोठा सन्मान आहे. या पुरस्काराने फिल्म, टी.व्ही. मिडीयातील कामगारांचे कल्याण व समाजाप्रती कार्य करण्यासाठी आम्हांला नवी प्रेरणा मिळेल.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमच्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल आम्ही परिक्षक मंडळाचे व या आजवरच्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्व समर्थक, सहकाऱ्यांचे आभार मानतो. त्यांच्या अथक परिश्रमाने आणि समर्पणामुळेच आम्हांला ही ओळख मिळाली आहे. या पुरस्काराने मला केवळ प्रोत्साहन आणि प्रेरणाच मिळाली नाही तर समाजाप्रती जबाबदारीची जाणिवही दिली आहे.







