मुंबई (संपादक सुनिल पाटील) । दि. २ जून रोजी कुऱ्हाडीने डोक्यावर व तोंडावर वार करुन बांधकामावरील मुकादमाचा खून केल्याप्रकरणी फरार असलेल्या अर्जुन किसन धोत्रे (वय २६, रा. पर्ल एजन्सी तळमजला, अंधेरी) यास सापळा रचून डी.एन.नगर पोलिसांनी अटक केली आहे.
दि.२ जून रोजी दुपारी ११ च्या सुमारास बाळू नारायण शिंदे (वय ३६) हा डी.सी.बी. बँकेच्या मागील अंधेरी येथील बांधकामाच्या साईटवर जेवण करुन झोपलेला असतांना आरोपीची आई गंगूबाई धोत्रे हिला केलेल्या शिवीगाळीचा राग मनात ठेवून अर्जुन धोत्रे याने कुऱ्हाडीने डोक्यावर व तोंडावर घाव घालून जबर जखमी केले होते. नंतर बाळू शिंदे याचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादाभाई नौरोजी नगर पोलिस ठाण्यात गु.र.क्र. ३५०/२०२३, भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करुन तपास सुरु करण्यात आला.
गुन्हा केल्यावर आरोपी अर्जुन हा बाळू शिंदे यांचा मोबाईल घेऊन मुंबईबाहेर पळून गेला होता. सारखी वास्तव्याची ठिकाणे बदलत असल्याने, त्याचा ठावठिकाणा पोलिसांना मिळू शकत नव्हता. अखेरीस त्याच्या शोधार्थ चार पथकांची नियुक्ती करून त्यांना नागपूर, जळगाव, बुलढाणा, नालासोपार, मनमाड, ठाणे, सुरत, चैन्नई या ठिकाणी पाठविण्यात आले.
दि.१२ जून रोजी सपोनि पवार व पोलीस पथकास तांत्रिक पुरावे व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अर्जुन धोत्रे त्याच्या बहिणीस भेटण्यासाठी जळगाव येथे येणार असल्याचे समजले. त्यावरून सपोनि राकेश पवार व पथक जळगावला पोहचले. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावून अर्जुनचा शोध घेतला असता, रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षात बसतांना त्यास जेरबंद करण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ ९ मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, दा.नौ.नगर विभाग मुंबईचे शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद कुरडे, पो.नि. अनिल मुळे, पो.नि. पठाण, सपोनि राकेश पवार, सपोनि वरपडे, पो.उ.नि नायकवाडी, पोउनि शेलार, मपोउनि भोसले, पोह. गोविंद पवार, पोशि राजू शिंदे, मेहेत्रे, प्रसाद वरे, अमित लाडे, ऋषि बाबर, पोह चव्हाण, पोशि पटेल, पोह राणे, पोह रतन पाटील, सचिन बोंगाणे, पोशि रांजणे, पोशि दुगाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल मुळे करत आहेत.







