मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) । दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता राम चरण याने त्याच्या फॅन्सना आनंदाची बातमी दिली आहे. लग्नानंतर ११ वर्षांनी राम चरणला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. त्याची पत्नी उपासना कामिनी हिने एका कन्येला जन्म दिला आहे. ही बातमी कळल्यानंतर या दोघा पती-पत्नींवर त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
काल रात्री अभिनेता राम चरणची पत्नी हैदराबादमधील एका रुग्णालयात जाताना दिसली होती. तेव्हापासून त्याचे चाहते या गोड बातमीची वाट बघत होते. आज अखेर अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली.
अभिनेता रामचरण आणि उपासनाचे १४ जून २०१२ साली लग्न झाले होते. दोघांनीही डिसेंबर २०२२ साली त्यांच्याकडे गूड न्यूज असल्याची बातमी शेअर केली होती. उपासनाला आपले करियर पूर्ण करण्याची इच्छा होती. त्यामुळे तिने करियरकडे लक्ष केंद्रित करून त्यानंतर बाळाचे नियोजन केल्याचे तिने याआधी आपल्या मुलाखतीत सांगितले.







