विरार (कैलास ठाकूर) । ड्रग्जच्या गुन्ह्यातून भावाचे नाव कमी करण्याचे आमिष दाखवून आणि कुटुंबाला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका निलंबित पोलिसाने एका व्यावसायिकाकडून २२ लाख उकळल्याची घटना डोंगरीत समोर आली आहे.
या प्रकरणी निलंबित पोलिसासह एका खबऱ्याविरुद्ध डोंगरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या वर्दीला डाग लावणाऱ्या अशा घटनांमुळे गेल्या काही काळापासून मुंबई पोलिस दलाची बदनामी होत आहे.डोंगरीतील रहिवासी असलेल्या २९ वर्षीय तक्रारदार यांचा कपड्यांचा कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची नावेद सलीम परमार ऊर्फ पाव याच्यासोबत ओळख झाली. पोलिस खबरी म्हणून काम करत असल्याचे सांगून, कामे असल्यास सांगण्यास सांगितले.
मार्चमध्ये नावेद घरी आला. तक्रारदार यांचा मोठा भाऊ आसीफ कासम राजकोटवाला याचे नाव अमली पदार्थ विरोधी विभागाच्या वांद्रे युनिटने दाखल केलेल्या गुन्ह्यात आरोपी म्हणून आहे. युनिटमध्ये त्याच्या ओळखीचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गवारे असून त्यांना सांगून, भावाचे नाव गुन्ह्यातून काढू शकतो, असे सांगितले.
त्यांनी दुर्लक्ष करताच, भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर त्यात अन्य लोकांनाही अडकविण्याची भीती घातली. ठरल्याप्रमाणे ते गवारे याच्या युनिटमध्ये भेटण्यासाठी गेले. मात्र गवारेने युनिटमध्ये न भेटता तेथीलच हॉटेलमध्ये भेटले. तक्रारदार यांनी त्याला ओळखपत्र विचारताच तो चिडून काम करणार नाही असा ओरडला. नंतर त्याने लांबूनच पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवले.
दोघांनी भावाचे नाव गुन्ह्यातून काढण्यासाठी ३५ लाख आणि दोन ॲपल फोनची मागणी केली. तक्रारदार यांनी एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगताच, त्याने घरच्यांना त्याच गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवत, भावाला १० वर्षाची शिक्षा होईल असे सांगितले.
चर्चेअंती गवारेने २२ लाखांत काम होणार असल्याचा निरोप तक्रारदारांना दिला. ठरल्याप्रमाणे मार्च अखेरीस ११ लाख दिले. काही दिवसांनी गवारे दोन पानांचा पेपर घेऊन भावाचे नाव काढून टाकल्याचे सांगत, पेपरची एक कॉपी सही करून दिली. त्यानंतर, उर्वरित ११ लाख, आयफोन त्याला दिला.जीएसटी प्रकरणातून सुटका करण्यासाठी पोलिसाने कस्टम अधिकाऱ्यांच्या मदतीने व्यावसायिकाची एक कोटीची फसवणूक केली. रेल्वे पोलिस जयेश कदमसह दोन कस्टम अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद असून पुढील तपास आग्रीपाडा पोलिस करीत आहेत.







