जळगाव (संपादक सुनिल पाटील) । आज शुक्रवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील स्वस्त धान्य दुकानांचे वाटपात मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण झाल्याचे व जवळच्या व्यक्तींना दुकान वाटप झाले असून, या प्रकाराची चौकशी करुन, संबंधितांवर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहर व तालुक्यामध्ये शासनाच्या स्वस्त धान्य दुकान वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण होवून, जवळच्या व्यक्तींना दुकान वाटप झाले आहे. यामुळे जे पात्र लाभार्थी आहेत, त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी जिल्हाधिकारी यांनी टाकलेल्या छाप्यात स्वस्त धान्य दुकानाचा माल पकडण्यात आला आहे. यावरून स्वस्त धान्य दुकानांतील काळाबाजार कितीप्रमाणात असू शकेल याचा अंदाज येतो आहे. तरी या सर्व प्रकाराची त्वरित चौकशी होवून, संबंधितांवर योग्य ती कडक कारवाई करावी.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, शहराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्यासह शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







