प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रोहिणी खडसे यांनी सादर केला जनसंवाद यात्रेचा कार्यअहवाल

rohinitai-khadse

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट २०२२ ते संविधानदिन २६ नोव्हेंबर २०२२ या कालावधी दरम्यान मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रा काढली होत. या यात्रेसंदर्भातील अहवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सादर केला.

 

या जनसंवाद यात्रेत रोहिणी खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील १८२ गाव-वस्त्या, खेड्यां- पाड्यांवर जाऊन तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तेथील नागरिकांचे ताबोडतोब सुटणारे प्रश्न संबंधित विभाग, अधिकारी यांच्या सोबत दूरध्वनी वरून संपर्क साधून तिथेच मार्गी लावले होते व काही प्रश्न पक्ष कार्यालय आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सोडविले होते. सार्वजनिक हिताच्या मागण्या आ.एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

 

रोहिणी खडसे यांनी या यात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्यता नोंदणी अभियान राबवून सदस्य नोंदणी करून घेऊन बुथ रचना, शाखा समित्या स्थापन केल्या होत्या. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेली विकास कामे, कल्याणकारी योजना यांचा प्रसार करून सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला होता, यातून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत होण्यासाठी मदत झाली .

 

मतदारसंघातील मतदारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधण्यासाठी आणि पक्ष संघटन बांधणी साठी रोहिणी खडसे यांनी काढलेली जनसंवाद यात्रा फलदायी ठरली. यात्रेत आलेले अनुभव, यात्रेचा उद्देश, यात्रेला मिळालेली सफलता या सर्वांची माहिती असलेला संक्षिप्त अहवाल रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला .

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील बुथ कमिटया १०० टक्के पूर्ण करून नियमित बुथ कमिटी सदस्यांची मिटिंग घेण्याविषयी सूचना केल्या. तसेच एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम पदाधिकाऱ्यांनी राबवावा. त्यासाठी आणि पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी रोहिणी खडसे यांना योग्य ते मार्गदर्शन केले. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वच स्तरावर मजबूत करण्यासाठी व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे रोहिणी खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here