कोलकाता : पश्चिम बंगालमधील बांकुरा परिसरात आज रेल्वेच्या दोन मालगाड्यांचा भीषण अपघात झाला. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरल्यामुळे हा अपघात झाला आहे.
हा अपघात राज्यातील ओडा स्टेशन जवळ घडला. आज पहाटे ४ वाजता हा अपघात झाला.मागून येणाऱ्या माल गाडीने समोर चाललेल्या मालगाडीला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र एका मालगाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातग्रस्त दोन्ही मालगाडीमध्ये कोणतंही सामान नव्हतं. मात्र त्यांचा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावर धावणाऱ्या १४ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत, तर तीन रेल्वे गाडयांचा मार्ग बदलण्यात आला आहे. या मुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
हा अपघात सिग्नलमध्ये आलेल्या काही तांत्रिक अडणीमुळे झाला असल्याची माहिती रेल्वे सुत्रांकडून देण्यात आली आहे. समोर जाणाऱ्या मालगाडीला मागून येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. या अपघातामध्ये आठ डबे रेल्वे रुळावरून खाली घसरल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.







