अंबरनाथ (हर्षद कुलकर्णी) । कांदिवली पोलिसांनी अशाच एका अपहरण प्रकरणाची उकल केली आहे. ज्यात आरोपी आणि तक्रारदार एकमेकांना चांगले ओळखतात. अपहरण प्रकरणी कांदिवली पोलिसांनी कर्जत रायगड येथून तीन आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी समजलेली माहिती अशी की, आरोपींचे तक्रारदारासोबत पैशाचे व्यवहार होते. त्यामुळे आरोपी कांदिवली येथून तक्रारदाराचे अपहरण करून दिलेले पैसे परत मागू लागले. अच्छेलाल चित्रू यादव (५२), मनोहर हरिश्चंद्र देवघरे (३६) आणि मनीष अशोक पंचरस (४०) या तिन्ही आरोपींनी तक्रारदाराला कांदिवली येथून जबरदस्तीने रिक्षात बसविले. त्याला आरे कॉलनीच्या जंगलात नेण्यात आले. जिथे त्याच्या पत्नीच्या खात्यातून २ लाख ७५ हजार तर कुरार गावच्या एटीएममधून १ लाखांची रोकड काढण्यात आली. त्यानंतर जबरदस्तीने करारावर स्वाक्षरी करून ३० लाख दिले नाही, तर कुटुंबीयांना उचलून नेले जाईल. अशा धमक्या देऊन आरोपी निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कांदिवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत गिते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपींचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी रायगड जिल्ह्यातील तळ्यात लपल्याची माहिती मिळाली. आरोपींना पकडण्यासाठी कांदिवली पोलिसांनी स्टॉल मालकांच्या वेशात दूध गोळा करण्यासाठी स्टॉलवर पोहोचले. पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना तबेल्याच्या आतून अटक केली. कांदिवली पोलीस अपहरणाच्या वेळी आरोपींकडून जप्त केलेल्या पैशांचा तपास करत आहेत.







