पडघा (जिल्हा प्रतिनिधी एकनाथ पाटील) । पडघा – खडवली रस्त्यावरील मातोश्री वृध्दाश्रमाजवळ असलेल्या भात्सा नदीवर सकाळी ७ च्या सुमारास टेम्पो (क्रमांक एमएच ४८ सीओ ०१४९) मेलेल्या कोंबड्यांची सडलेली घाण नदीत टाकत होते. गावकऱ्यांनी त्यांना हटकले व घाण टाकत असल्याबद्दल त्यांना जाब विचारला.
गावकरी या नदीचे पाणी पित असल्याने, गावकऱ्यांनी ही घाण टाकण्यास विरोध केला मात्र टेम्पोतून आलेल्या लोकांनी गावकऱ्यांना शिवीगाळ केली व आमचे कुणीही वाकडे करु शकत नाही असे सांगितले. गावकऱ्यांचा विरोध वाढल्याने, टेम्पोतील लोकांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर गावकरी व सरपंचांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेबद्दल पोलिसांनी एनसीआर नोंदवून घेतला. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा तसाच प्रकार घडला. त्यानंतर सरपंच व गावकरी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेले असता, तेथे उपस्थित असणाऱ्या कॉन्स्टेबल राठोड यांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला.
सदर प्रकार हा पडघा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडत असून, या गंभीर प्रकाराची पोलिस दखल घेत नसल्याने दिसून येते आहे. तरी हा प्रकार त्वरित बंद होवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करत असल्याचे पत्र सरपंच सौ. निशा निलेश पाटील यांनी दिले आहे.







