सातारा (सत्यजित माने) । जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विंग येथे नवविवाहितेने किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्या विवाहितेच्या सासूला समजताच तिनेदेखील हाताच्या नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच नवविवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन सासरच्या घरासमोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे ता ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नीलम अनिकेत माने (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.तिचे अवघे तीन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
बीड येथील नीलमचा तीन महिन्यांपूर्वी विंग येथील अनिकेत मानेशी विवाह झाला होता. शनिवारी रात्री नीलम स्वयंपाकगृहात झोपली होती. तर पती अनिकेत, सासू राणी माने व सासरा अंकुश माने हे तिघे जण बाहेरच्या खोलीत झोपले होते. रविवारी सकाळी सातच्या सुमारास नीलम दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून स्वयंपाकगृहात प्रवेश केला. त्यावेळी नीलमने पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या मदतीने गळफास लावून घेतल्याचे आढळून आले. याचा धक्का बसल्याने नीलमची सासू राणी माने यांनी दोन्ही हातांच्या नसा कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.







