भावाने केला बहिणीच्या पूर्व प्रेमीवर हल्ला

attack

नागपूर (प्रतिनिधी मिलिंद खेकाळे) । ब्रेकअप झाल्यानंतरही तरुणीचा पूर्व प्रेमी तिला लग्नासाठी सतत त्रास देत होता. याबाबत तरुणीने तिच्या भावाला माहिती दिली. भावाने तरुणाला समजावून सांगितले. मात्र तरीही बहिणीचा पूर्व प्रेमी ऐकत नव्हता.

 

त्याचे तरुणीला वारंवार त्रास देणे सुरूच होते. बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे तिच्या भावाने मित्रांसह तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, बुधवारी त्याचा येथे मृत्यू झाला. त्याचबरोबर या प्रकरणी अजनी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमाई नगर रहिवासी २९ वर्षीय निखिल उके असे मृत व्यक्तीचे नाव असून आरोपींमध्ये हिमांशू मून, अंकित वाघमारे आणि विशाल फुलमाळी यांचा समावेश आहे. वास्तविक, आरोपी हिमांशू मूनच्या बहिणीचे निखिल उकेसोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघे एकमेकांशी लग्नही करणार होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे नाते तुटले आणि मुलीने लग्नास नकार दिला.

 

असे असतानाही निखिल तिच्यावर लग्नासाठी वारंवार दबाव टाकू लागला. मुलीने हा प्रकार तिचा भाऊ हिमांशूला सांगितला. काल रात्री हिमांशूने फोन करून निखिलला घराजवळ बोलावून समजावून सांगितले होते. त्याचवेळी त्यांची एकमेकांशी हाणामारी झाली आणि याच भांडणात हिमांशूने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह निखिलवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

 

मात्र, त्यानंतर जखमी निखिल हिमांशूच्या घरी पोहोचला आणि त्यानंतर त्याचा पूर्व गर्लफ्रेंडनेच निखिलच्या आईला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. निखिलच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here