ब्रेक फेल होऊन कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात; १२ ठार

accident-on-mumbai-agra-highway

धुळे (प्रतिनिधी) । मुंबई – आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ ब्रेक फेल होऊन कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात पंधरा ते वीसजण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेजवळील पळासनेर गावाजवळ साधारणतः दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. महामार्गावरुन एक कंटेनर जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ ते २० जण जखमी झाले आहेत. सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

 

प्राथमिक माहितीनुसार, महामार्गावरुन जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हॉटेलमध्ये शिरला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहने उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहनांनाही धडकला. या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असून, स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अपघाताची माहिती कळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अंगद आसटकर यांच्यासह पोलिसांनी धाव घेत मदतकार्याला वेग दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here