सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) । आषाढी एकादशीनिमित्त विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यात ही घटना घडली आहे.
साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी या ठिकाणी राहणारे काही गावकरी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. हे सगळे भाविक बलोरो कारने पंढरपुरच्या दिशेने प्रवास करत होते. याच दरम्यान माण तालुक्यातील लोधवडेजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. या अपघातात कल्याण भोसले या भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सध्या सातारा पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरु आहे.







