पुणे (जिल्हा प्रतिनिधी सुहास गायकवाड) : पुण्यासह महाराष्ट्रातील वेग-वेगळ्या जिल्ह्यांमध्ये दरोडा व घरफोड्या करणारा रेकॉर्डवरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ९ गुन्हे उघडकीस आणून २ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी करण्यात आली. सोनु उर्फ संजिव कपुरसिंग टाक (वय-२८ रा. तुळजाभवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी 454,457,380,411,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल आहे. तसेच राज्यातील वेग-वेगळ्या पोलीस ठाण्यात तो फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास युनिट सहाचे पथक करत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंडे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संजिव टाक हा मांजरी बुद्रुक येखील स्मशानभूमीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. युनिट सहाच्या पथकाने मांजरी येथील स्मशानभूमीजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले.







