ठाणे (क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या ज्वेलर्स दुकानाच्या मालकाने १२ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दुकानातील कारागिराकडे मोठ्या विश्वासाने दिले. मात्र डोक्यावर ५० हजारांचे असलेले कर्ज फेडण्यासाठी हा कारागीर मालकाने दिलेल्या दागिन्यांसह पसार झाला. एकीकडे रामनगर पोलिसांनी या दगाबाज कारागिराला मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बसंतीलाल चपलोत (६६) यांच्या मालकीचे डोंबिवली रेल्वे समांतर असलेल्या नेहरु रोडला प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रम गोपाळ रावल (२८) हा गेल्या काही वर्षांपासून विश्वासाने काम करतो. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळी त्याच्याकडे दुकानातील १२ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दिले. हे दागिने त्याने इच्छितस्थळी नेणे मालकाला अपेक्षित होते.
नोकर विक्रम हा गुरुवारी संध्याकाळी दुकानातून सोन्याचा ऐवज घेऊन बाहेर पडला. सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला आहे का? याची खात्री करण्यासाठी मालक बसंतीलाल यांनी विक्रमशी संपर्क साधला. मात्र तेथे तो पोहोचला नसल्याचे कळल्यावर मालकांनी हॉलमार्क केंद्राशी संपर्क साधला. तेथेही तो गेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विक्रमची परिसरात शोधाशोध केली असता तो कुठेही आढळून आला नाही. तर त्याचा मोबाईल देखील बंद असल्याचे आढळून आले. विक्रमने विश्वासघात करुन सोन्याचा ऐवज लांबविला असल्याची खात्री पटल्यानंतर मालक बसंतीलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन फरार विक्रमच्या विरुध्द तक्रार दाखल केली.
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, हवा. निलेश पाटील, विशाल वाघ, निसार पिंजारी, नितीन सांगळे असे तपास पथक रहस्यमयरित्या गायब झालेल्या विक्रमच्या मागावर होते. या पथकाने चपलोत यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाच वेळी तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे विक्रम ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना पाहताच विक्रमने धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत त्याची फर्लांगभर अंतरावर त्याची गठडी वळली.







