मुंबईत एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या

rupal-ongre

मुंबई (प्रतिनिधी) : पवई येथे रुपल ओग्रे या एअरहोस्टेसची हत्या झाली होती. मुंबई पोलिसांनी याप्रकरणात एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती. आरोपीने गळा चिरून रुपची हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता या आरोपीने शुक्रवारी (दि.८) सकाळी लॉकअपमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रुपल ओग्रे ही एअर इंडियामध्ये एअर होस्टेसचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळची छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. एप्रिल महिन्यातच ती मुंबईत आली होती. मुंबईत रुपल मरोळ येथील टाटा पॉवर सेंटर बस स्थानकाजवळील कृष्णलाल मारवाह मार्गावरील एनजी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होती. ती तिची बहीण आणि तिच्या मित्रासोबत राहत होती. रुपलची बहीण आणि तिचा मित्र आठ दिवसांपूर्वी मुंबईहून रायपूरला गेले होते. रूपल रविवारी सकाळी व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे तिच्या कुटुंबाशी बोलली होती. यानंतर तिचा मोबाईल बंद लागत होता. कुटुंबीयांना मुलीची काळजी वाटू लागली, म्हणून त्यांनी तिच्या काही मित्रांना फोन केला. तिच्या एका मित्राने घटनास्थळ गाठलं, तेव्हा त्याला रूपलच्या फ्लॅटला कुलूप दिसले. त्याने सोसायटीला याबाबत माहिती दिली, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता रुपल त्यांना मृतावस्थेत आढळून आली. रुपलचा गळा चिरून तिचा खून करण्यात आला होता.

प्राथमिक माहितीनुसार आरोपीने स्वत:च्या पॅन्टने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here