आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

chandrababu-naidu
File Photo

हैदराबाद (वृत्तसंस्था) : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. आज सकाळीच ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर चंद्राबाबू नायडू यांची वैद्यकीय तपासणी केली जात असून त्यांना विजयवाडा येथे नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल.

 

मिळालेल्या माहितीनुसार, कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने चंद्राबाबू नायडू यांना अटक केली आहे. २०२१ मध्ये या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. २५० कोटी रुपयांचा हा घोटाळा असून चंद्राबाबू नायडू यात प्रकरणात आरोपी क्रमांक एक आहेत.

चंद्राबाबू नायडू हे शुक्रवारी नंद्याल जिल्ह्यातील बनगलनपल्ली येथे सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. ही सभा झाल्यानंतर चंद्राबाबू व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. याच दरम्यान, पहाटे साडे तीनच्या आसपास पोलीस उपमहानिरीक्षक रघुरामी रेड्डी आणि सीआयडीच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने चंद्राबाबू नायडू यांना अटक केली.

दरम्यान, चंद्राबाबू यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. मात्र मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या पोलिसांनी चंद्राबाबू यांना अटक केली. तसेच चंद्राबाबूंच्या सुरक्षेसाठी तैनात एसपीजी कमांडो यांनीही पोलिसांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. साडे तीनच्या आसपास पोहोचलेल्या पोलिसांनी या कारवाईवेळी संपूर्ण परिसर सील केला होता. यानंतर सहाच्या सुमारास पोलिसांनी चंद्राबाबू यांना व्हॅनिटी व्हॅनमधून उतरवून बेड्या ठोकल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here