मुंबई (विशेष प्रतिनिधी अजयश्री) : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा नातेवाईक नझीर मोहम्मद फकी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. १९९२ मध्ये मुंबईतील जे.जे रुग्णालयात झालेल्या गोळीबारात नझीर मोहम्मद हा प्रमुख आरोपी होता.
गेल्या तीन दशकांपासून पोलिसांना चकमा देत असलेल्या नझीरला सोमवारी (११ सप्टेंबर) तपास यंत्रणांनी परदेशातून अटक केली आहे. लवकरच त्याला भारतात आणले जाणार आहे. त्याचे कुठलेही छायाचित्र उपलब्ध नव्हते, असं असून सुद्धा तपास यंत्रणांनी माहितीच्या आधारे नझीरचा शोध घेत त्याला अटक केली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमने त्याची बहीण हसिना पारकरचा पती इस्माईल पारकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नझीरचा वापर केला होता.
मुंबई पोलिसांनी सांगितले की, नझीर मोहम्मद हा परदेशात लपून बसल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर, मुंबई गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) जारी करण्यासाठी अर्ज केला. त्यानंतर फकीच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली. सोमवारी त्याला परदेशातून अटक करण्यात आली आहे. लवकरच फकीला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







