मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : लोकप्रिय मराठी सोशल मीडिया स्टार मृणाल दिवेकरने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने लहान असताना तिच्याबरोबर घडलेला एक वाईट प्रसंग सांगितला. एका ट्युशन टिचरने आपल्याला नग्न केलं होतं, असा धक्कादायक खुलासा मृणालने केला आहे.
मृणाल म्हणाली, “माझ्या एका ट्युशन टिचरने मी होमवर्क केला नव्हता म्हणून मला नग्न केलं होतं. त्यावेळी मी तिसरीत की चौथीत होते, माझं वय ९-१० वर्षे असेल. मी दोन-तीनवेळा होमवर्क केला नव्हता म्हणून असं केलं होतं.
सोबतच मृणालने ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये तिच्या शाळेतील अनुभवही सांगितला. ती कराडच्या एका शाळेत आधी शिकायची.तिथून नंतर इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेले. त्यामुळे दोन्ही शाळेतला फरक मला लवकर कळला. दोन्ही ठिकाणी दिल्या जाणाऱ्या वागणुकीतला फरक कळला. मी कराडमध्ये होते तिथे मला खूप अडचणी होत्या. ते मला खूप तुच्छतेने वागवायचे. तिथले शिक्षक मारायचे, वाचता आलं नाही, गणित सोडवता आलं नाही तर ते खूप अपमान करायचे.
लहान मुलांना सर्वांसमोर मारणं, त्यांचे कपडे काढणं, तोंडावर चिकटपट्टी लावणं या गोष्टींचे नंतर खूप आघात होतात. तणाव येतो, स्वतःवर शंका येते की मी चांगली आहे की नाही, मी हे चांगलं करतेय की नाही, लोक जज करतील का, असे विचार मनात येतात. शिक्षकांना तेव्हा याचे परिणाम माहीत नसतात, पण मुलांच्या मनावर या गोष्टींचे आघात बराच काळ राहतात,” असं मृणाल म्हणाली.







