आजारी आईच्या उपचारांसाठी मुलाचे अपहरण करुन मागितली ३० लाखांची खंडणी

kidnap

पुणे (प्रतिनिधी सुहास गायकवाड) : आजारी आईच्या उपचारांसाठी पैसे कमी पडल्याने ३० लाख रुपयांच्या खंडणीसाठी एकाने दोघा साथीदारांच्या मदतीने हिंजवडी परिसरातील एका व्यावसायिकाच्या १४ वर्षीय मुलाचे शस्त्रांच्या धाकाने अपहरण केले. सासवड पोलिसांनी सापळा रचून त्या तिघांच्याही मुसक्या आवळून अपहृत मुलाची सुखरूप सुटका केली. हिंजवडीतून मंगळवारी (दि. १२) सकाळी ७ वाजता सुरू झालेले हे अपहरणनाट्य सासवड शहरातील जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदिर रस्त्यावर रात्री १० वाजता संपले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातून मंगळवारी सकाळी ७ वाजता शस्त्रांच्या धाकाने एका व्यावसायिकाच्या १४ वर्षीय मुलाचे निळ्या रंगाच्या मारुती झेन कारमधून अपहरण झाले. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या वडिलांना ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. या घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता त्याचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता ते लोकेशन सासवड हद्दीत निघाले. त्यानुसार सासवड पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पथके तयार करून सासवड शहरात येणार्‍या रस्त्यांवर शोध मोहीम सुरू केली. जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदिर रस्त्यावरील सिध्दिविनायक अ‍ॅटो गॅरेजसमोर पोलिसांना एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयितरीत्या येताना दिसली, त्या वेळी पोलिसांनी कार अडवली. कारमध्ये तिघांसह एक लहान मुलगा होता. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक अग्निशस्त्र, कोयता, सत्तूर, कटावणी, हातोडी, ३ मोबाईल, मास्क मिळून आले.

पोलिसांनी तेजस ज्ञानोबा लोखंडे (रा. दत्त मंदिराशेजारी, मारुंजी, ता. मुळशी; मूळ रा. मरकळ, ता. खेड), अर्जुन सुरेश राठोड (रा. दत्त मंदिराशेजारी, मारुंजी, ता. मुळशी; मूळ रा. लांबुरातांडा, ता. निलंगा, जि. लातूर) आणि विलास संजय म्हस्के (रा. शिवारवस्ती, भुमकर चौक, पिंपरी-चिंचवड; मूळ रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) या आरोपींना ताब्यात घेत चौकशी केली असता एकाची आई आजारी असल्याने त्याला उपचारांसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने दोघा साथीदारांच्या मदतीने मुलाचे त्याच्या घरासमोरून अपहरण केले. तसेच, त्यांनी त्या मुलाच्या वडिलांना फोन करून ममुलगा जिवंत हवा असेल तर ३० लाख रुपये घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी ये, असे म्हणत खंडणी मागितल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे, विनोद महांगडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पालवे, सहायक फौजदार सुनील चिखले, पोलिस हवालदार रूपेश भगत, लियाकत मुजावर, किसन कानतोडे, सुरज नांगरे, सुहास लाटणे, जब्बार सय्यद यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here