ठाणे (क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : देशभरात चैन स्नेचीग, जबरी चोरी, वाहन चोरी करत धुमाकूळ घालणाऱ्या इराणी चोरट्याला कल्याण जवळच्या आंबिवली इराणी वस्तीतुन सापळा रचत कल्याण खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अपेदारा आफ्रिदि असे या चोरट्याचे नाव असून आफ्रिदी याने काही दिवसांपूर्वी चोरट्याला अटक करण्यास गेलेल्या मुंबई पोलिसांवर दगडफेक केली होती. अटक करण्यात आलेला आफ्रिदी हा १० गुन्ह्यांमध्ये फरार होता.
ठाणे जिल्हासह राज्य व देशभरात चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या अपेदारा आफ्रिदी याचा शोध पोलीस घेत होते. मात्र अनेक वर्षापासून तो पोलिसांना चकवा देत होता. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांचे पथक कल्याणजवळ आंबिवली येथील इराणी वस्तीत एका चोरट्याला अटक करून नेत असताना अपे आफ्रिदि याने विरोध करत पोलिसांवर दगडफेक केली होती. पोलीस आफ्रिदीचा शोध घेत होते. आफ्रिदी कल्याण जवळील आंबिवली मंगलनगर येथे राहत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड व त्यांच्या पथकाने मंगल नगर परिसरात सापळा रचला. आफ्रिदी येताना दिसताच त्याच्यावर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. आफ्रिदी विरोधात देशभरात ३० हून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.







