रामेश्वर धरणातून परसुल चिंचवे धरणात पाणी सोडण्यात यावे – केदा आहेर

chankapur-dam
रामेश्वर धरणातून पूर पाणी झाडी एरंडगाव वाढीव कालव्याद्वारे पूर्व भागासाठी सोडण्यात यावे ,या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे देतांना भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर समवेत मविप्रचे तालुका संचालक विजय पगार , सुनील देवरे आदी (छाया -सोमनाथ जगताप)

नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : चणकापुर धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असल्याने पुरपाण्याचा विसर्ग गिरणा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पूर पाणी झाडी एरंडगाव वाढीव कालव्याद्वारे पूर्व भागातील परसुल व चिंचवे धरणात टाकून धरणे भरून द्यावीत ,अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नाशिक लोकसभा प्रभारी केदा आहेर यांनी आज शुक्रवारी दि १५ रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जलसंपदा विभागाचे कनिष्ठ अभियंता संजय साळे हे उपस्थित होते.

निवेदनाचा आशय असा की, पावसाळा चालू होऊन तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. देवळा तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाउस झाला असल्यामुळे हया भागातील पाझरतलाव, धरणे, साठवण बंधारे, कोरडेच आहेत. भूजल पातळी खाली गेली आहे . त्यामुळे खरिपाची पेरणी संकटात सापडली आहे. पूर्व भागातील महत्वाचे असलेले उमराणा येथील परसुल व चिंचवे धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.. ह्या धरणावर उमराणा, तिसगाव, दहिवड व इतर गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. पूर्व भागात आताच पाणीटंचाईने भीषण स्वरूप धारण केले आहे.

तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, वाखारी, दहिवड, मेशी, सुभाषनगर, वाखारवाडी, खुंटेवाडी, उमराणा आदी कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावातील जनता चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची वाट पहात आहेत. आज भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे तसेच सिंचना अभावी खरीप वाया जाऊ नये यासाठी तात्काळ उजव्या वाढीव कालव्याद्वारे पुर पाणी सोडून परसुल आणि चिंचवे धरण भरून पूर्व भागातील जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन केदा आहेर यांनी दिले. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संचालक विजय पगार, उमराणाचे सुनील देवरे ,भूषण देवरे ,वाखारीचे उपसरपंच मंगेश आहेर आदींसह पूर्व भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here