कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची चमकदार कामगिरी सुरू आहे. भारताने आतापर्यंत एकुण ३४ पदकं पटकावली आहेत. यापैकी १९ पदकं ही नेमबाजांनी जिंकून दिली आहेत.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात स्वप्निल कुसाळेसह ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, अखिलेशवरण यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
कोल्हापूरकर स्वप्निल कुसाळेने ५९१, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने ५९१ आणि अखिलेशवरण ५८७ गुणांची कमाई केली. एकुण १७६९ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत चीनला धुळ चारली. या सांघीक यशानंतर कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तसेच घवघवीत यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
स्वप्निल कुसाळेने भोसला मिलिटरी स्कुलमधून नेमबाजीचे धडे गिरवले. त्याने ५९ व्या आणि ६१ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१५ मध्ये कुवेत येथे उपकनिष्ठ आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेतील थ्री प्रेान प्रकारात त्याने जेतेपदाला गवसणी घातली होती.







