जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव जिलस्ह्यातील बहुतांशी मंडळामध्ये सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना मदत मिळावी, कापूस व सोयाबीन अनुदानात इ पीक पेरा न केलेल्या पण उताऱ्यावर पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावा, अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या टाटा ESHA कंपनीच्या बोगस कापसाच्या बियाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, रब्बी हंगाम २०२३ – २४ च्या ऑनलाईन तक्रार केलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा द्यावा आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
या निवेदनात जळगाव जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाची नोंद झाली. या झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. तरी आपण सरसकट पंचनामे करून तात्काळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानातून इ पीक पेरा नसलेल्या पण उताऱ्यावर पिकांची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे. तरी या शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन अनुदान यादीत नाव आलेले नाही. तरी याची नोंद घेऊन, शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन TATA ESHA या कंपनीच्या कापूस बियाण्याची लागवड केली होती. १२० दिवस झाले तरी पिकाला कोणतेही फळ आलेले नाही. तरी याची तात्काळ दखल घेऊन या कंपनीवर कारवाई करून संबंधित बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. रब्बी हंगाम २०२३ – २४ मध्ये अनेक वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या पोर्टलवर ऑनलाईन तक्रारी केलेल्या आहेत तरी त्या शे्तकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर भगतसिंग बापू पाटील, सुरेश पी. पाटील, सुभाष पाटील, धनगररत्न पाटील, डॉ.अनिल शिंदे, प्रतापराव पाटील, त्र्यंबक पाटील, दिनेश पवार, मालोजीराव पाटील, समाधान पाटील, किशोर पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







