सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : वाढत्या मोटारसायकल चोरीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावल यांनी सूचना दिल्याप्रमाणे पंढरपूर विभागाचे उपअधीक्षक डॉ.अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर विश्वजित घोडके यांनी पथकांना कार्यान्वित केले होते.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार अहिल्या हॉटेल समोरून चोरी गेलेल्या मोटारसायकलबाबत गुप्त बातमीदारांकडून आरोपी लखन शिवराय लोहार (रा.आळंदी रोड, साई कॉम्प्लेक्स, दिघी, पुणे) हा भटुंबरे गावात आल्याची माहिती मिळाल्यावरून सापळा रचून पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याची विचारपूस केली असता, त्याने पंढरपूर शहरातून तसेच पुणे, पिंपरी, चिंचवड, सोलापूर येथील १८ मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या एकूण मोटारसायकलींची किंमत दहा लाख ७० हजार रुपये होती. त्याच्या माहितीवरून विनोद बळीराम घुले (रा.कल्पना नगर, कळंब, जि.धाराशीव) यांच्याकडून १८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगिरी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, सपोफौ राजेश गोसावी, नागनाथ कदम, सपोफा शरद कदम, पोह बिपीनचंद्र ढेरे, सुरज हेंबाडे, सिरमा गोडसे, नितीन पलुसकर, सचिन हेंबाडे, नवनाथ माने, पोकाँ शहाजी मंडले, समाधान माने, बजरंग बिचुकले, निलेश कांबळे तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.






