ठाणे (क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी पतीने पत्नीची गळा चिरून खून केल्याची घटना घडली होती. पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ८ ऑक्टोबरला ही घटना घडली होती.
पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते. याच वादातून संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत, गळा चिरून तिचा खून केला आणि घरातून पसार झाला.पतीने पत्नीचा खून का केला? यावर आरोपीने धक्कादायक कबुली दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ८ दिवस माग काढत अखेर वाराणसीहून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
तीन वर्षांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला होता. वर्षभरापूर्वी त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला होता. यानंतरच त्यांच्या सुखी संसारात वाद होण्यास सुरुवात झाली. रुपाली मुलीचा सांभाळ नीट करत नसल्यामुळे विकीचे तिच्याशी नेहमीच वाद होत होते. याच वादातून ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्यात मोठा वाद झाला. याच वादातून विकीने रूपालीचा पट्ट्याने गळा आवळला आणि धारदार चाकूने तिचा गळा चिरून तिचा खून केला.
सुरुवातीला चारित्र्याच्या संशयातून खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत होता. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेला होता. दुसरीकडे विकीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली होती. विकी उत्तर प्रदेशात पळून गेला. त्याचा माग काढत असतानाच तो उत्तर प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख, भागवत सौंदाणे, कैलास पादीर हे तिघे तातडीने वाराणसीला रवाना झाले. तिथे स्थानिकांच्या वेशभूषेत सापळा रचून या तिघांनी विकीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतलं.







