बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक

baba-siddique-murder

ठाणे (क्राइम रिपोर्टर लक्ष्मीनारायण वन्नम) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी पाच आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ९ जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई, कर्जत आणि पनवेल परिसरातून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याआधी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं देशाच्या विविध भागात पाठवण्यात आली असून आरोपींचा शोध घेत होती. याच दरम्यान, शुक्रवारी त्यांना मोठं यश मिळालं असून पाच आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच झिशान सिद्दिकी यांच्या कुटुंबीयांना आतापर्यंत केलेल्या तपासाबाबत माहिती देण्यात आली आहे.

 

दुसरीकडे, सलमान खानच्या हत्येचं प्लॅनिंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला सुखवीर उर्फ ​​सुक्खाला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुखवीर याला पानिपत येथून अटक करण्यात आली होती.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी त्यांच्यासोबत एकच सिक्योरिटी गार्ड होता. त्यावेळी त्या सिक्योरिटी गार्डने प्रत्युत्तर दिलं नाही. कारण त्याच्या डोळ्यात मिरचीसारखं काहीतरी गेलं. त्यामुळे तो काहीच करू शकला नाही, असा दावा सिक्योरिटी गार्डने केला आहे. दरम्यान, बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here