जळगाव (प्रतिनिधी गिरीश पवार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभागामार्फत दरवर्षी प्रदुषण मुक्त दीपावलीचा उत्सव साजरा करण्यात येतो. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना चला आपण संकल्प करु या, प्रदुषण मुक्त दीपावलीचा आनंद घेऊ या तसेच दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करु या, असे आवाहन करण्यात येते.
शासन निर्णय क्र.इएनव्ही-2010/प्र.क्र.106/ता.क., मंत्रालय, मुंबई दि.3 मे 2011 या शासन निर्णयानुसार कोणत्याही धर्मांच्या सणांचे साजरीकरण विशेषतः सार्वजनिक स्तरावर होणारे सणांचे साजरीकरण हे जनसमुदायाला नवचैतन्य देणारे असावे.जाणते अजाणतेपणी काही वेळा अशा साजरीकरणातून निसर्गाच्या जल,हवा, ध्वनी या प्रमुख घटकांचे प्रदुषण मानवी समाजासाठी हानीकारक ठरत असते. ते हितकारक नाही.आता येणाऱ्या दिवाळी सणात फटाके फोडल्यानंतर होणारे प्रदुषण हे दरवर्षी प्रदुषण नियंत्रण मंडळ मोजत असते, ते वाढतच आहे,ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. दरवर्षी महाराष्ट्र राज्यात सुमारे पाचशे कोटी रुपये किंमतीची फटाके फोडले जातात.दिवाळी सणापूर्वी आणि दिवाळी सणानंतर प्रदुषण नियंत्रण मंडळ हवेतील प्रदुषणाची नोंद घेत असून प्रदुषण पातळी वाढलेली आढळते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही पर्यावरण प्रेमी संघटनांच्या पुढाकाराने दरवर्षी सुमारे पंचवीस ते पन्नास कोटी रुपये किंमतीची फटाके कमी फुटतात.शालेय विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून मी गेल्या वर्षापेक्षा किमान शंभर रुपये किंमतीची फटाके कमी फोडेन असे वदवून या उपक्रमाद्वारे वातावरणातील प्रदुषित घटकांचे उत्सर्जन कमी केले जाते.
फटाक्यांपासून कार्बन डाय ऑक्साईड, कार्बन मोनाॅक्साईड, सल्फर डाय ऑक्साइड,टार पार्टीकल्स फाॅस्फरसचे आॅक्साईड या सारखे विषारी वायू बाहेर पडतात.रंगित फटाक्यापासून वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचे आॅक्साईड्स तयार होऊन वातावरण प्रदुषित होते.त्यातील काही घटक कार्सिनोजेनीक म्हणजे कर्करोगासाठी कारणीभूत ठरतात.काही प्रदुषित घटकांपासून फुफ्फुसांचे,हृदयांचे आजार होतात.पक्षी, गुरेढोरे, काही छोटे प्राणी यांच्या जीवनमानात बदल होऊन त्यांची संख्या कमी होत चालली आहे.जैवविविधतेचे नुकसान दिसत आहे.हवा आणि जल यांचे प्रदुषण होतेच होते.कधीकधी तर शरिराचे अंगही भाजते. शिवाय ध्वनिप्रदूषण हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात होते.काहींना ह्रदय रोगांचे आजार असल्यास त्यांना अटॅक येण्याची शक्यता असते.विशेषत: लहान बाळांना ध्वनिप्रदूषणापासून लांब ठेवावे लागते.ह्या वर्षी शासनाने ध्वनिप्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे ठरविले आहे.त्याचे महा. अंनिसने स्वागत केले आहे.
फटाके निर्मितीच्या कारखान्यात लहान मुले(बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा आहे) तसेच बायकांना देखील काम करावे लागते.त्यांचे शोषण होतेच होते.कधीकधी फटाक्यांच्या कारखान्यात आग लागते, तेव्हा अपघातात मुलांचा,बायकांचा समावेश असतो,हे वेगळे सांगायला नको.८० डेसीबलपेक्षा मोठ्या आवाजाच्या फटाके निर्मितीस या वर्षी बंदीचे आदेश दिले आहेत. प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करु या, दिवाळी सणाचा आनंद घेऊ या, असे आवाहन दिगंबर कट्यारे राज्य कार्यवाह वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प विभाग महा. अंनिस यांनी केले आहे.







