जळगाव (विशेष प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांनी १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी मंगळवारी जिल्हाभरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हददीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असुन ट्रेझरी येथे जमा केली आहे.
भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन ४ लाख ४६ हजार १२० रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत.
तसेच कासोदा पोलीस स्टेशन हददीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असतांना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० च्या नोटा मिळुन आल्या. ही रक्कम तब्बल १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.







