नाशकात दीड लाखाचे भेसळयुक्त तूप जप्त, अन्न औषध प्रशासनाची मोठी कारवाई

FDA

सटाणा (क्राइम रिपोर्टर सागर अहिरे) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न औषध प्रशासनातर्फे (एफडीए) मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम राबविली जात आहे. सातपूर येथील सागर स्वीट्स या दुकानातून दीड लाख रुपयाचे गायीचे तूप संशयावरून जप्त केले आहे. तसेच दुय्यम दर्जाची मिठाई विकली जात असल्याने इंदिरानगर येथील सम्राट स्वीट्स सील करण्यात आले.

 

सण-उत्सवात गोडी आणणाऱ्या विविध प्रकारच्या मिठाईने शहरातील दुकाने सज्ज झाली आहेत. विविध प्रकारची, चविष्ट आणि आकर्षक मिठाई घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. याची दखल घेत ‘एफडीए’ने खवा, मावा, तूप, तेल व मिठाई यांच्या शुद्धतेवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही प्रकारे आरोग्यास हानीकारक ठरेल, अशी मिठाई विकली जाऊ नये यासाठी ‘एफडीए’ आवश्यक ती खबरदारी घेत आहे.

 

अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित केलेल्या परवाना अटीचे उल्लंघन होता कामा नये, अन्नातून विषबाधा होणार नाही, यासाठी काय करावे आदीबाबत मिठाई उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनातर्फे बुधवार (दि. २३) सातपूर येथील सागर स्वीट्स या दुकानात धाड टाकण्यात आली. यात परराज्यातून आलेल्या १५ किलोग्रॅम डब्यातून गायीच्या तुपाचा नमुना घेण्यात आला. एक लाख ४८ हजार २५५ रुपये किंमतीचा साठा भेसळयुक्त असल्याच्या संशयाने जप्त करण्यात आला. त्यानंतर इंदिरानगर येथील सम्राट स्वीट्स या दुकानात याच दिवशी तपासणी करण्यात आली. विनापरवाना मिठाईचे उत्पादन व विक्री करत असल्याने येथून गायीचे तूप, काजू रोल, मलाई बर्फी असे पदार्थ जप्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here