सावदा (क्राइम रिपोर्टर अजहर खान) : संपूर्ण राज्यात गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगावातील अवसायक चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, मूळ रा. गांधीनगर, नागपूर) व वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना मुख्य कार्यालयातच मंगळवारी सायंकाळी अटक केली आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही धडक कारवाई केली आहे. राज्यभर गाजलेल्या बीएचआर प्रकरणात अवसायक अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधून कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले असून त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी (वन टाईम सेटलमेंट) किती रक्कम भरावी लागेल? याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे जळगवातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते.
वसुली अधिकारी सुनील पाटील यांनी तक्रारदार यांच्या आई व व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या किंवा वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडून परवानगी देण्याच्या मोबदल्यात दोघांसाठी दिड लाख रुपयांची लाच १४ ऑगस्ट २०२४ रोजी मागितली होती व लाच रक्कमेत तडजोड होणार नसल्याचेही तक्रारदाराला बजावल्यानंतर त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला होता.
संशयित आरोपी अवसायक चैतन्य नासरे यांनी लाच रक्कम संशयित आरोपी सुनील पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्यानंतर मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराने रक्कम दिली व लागलीच एसीबीने दोघांना अटक केली. एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, स्वप्नील राजपूत (वाचक पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक संदीप बबन घुगे, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस नाईक गणेश निंबाळकर, पोलीस शिपाई नितीन नेटारे, पोलीस हवालदार प्रभाकर गवळी, पोलीस शिपाई सुरेश चव्हाण, चालक पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.







