राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा

sanjay-varma

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली होती. काँग्रेससह इतर पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली होती. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत चर्चा रंगली होती. अखेर आता राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. ते सध्या महाराष्ट्रात कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून काम पाहत आहेत. वर्मा हे एप्रिल २०२८ मध्ये पोलीस सेवेतून निवृत्त होतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या महासंचालक पदासाठी ते आघाडीवर होते.

 

महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यामुळे रिक्त महासंचालक पदासाठी विवेक फणसळकर यांच्यासह संजय कुमार वर्मा, सदानंद दाते आणि रितेश कुमार यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. आता राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी मोठ्या प्रमाणावर आरोप सुरू होते. विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शुक्ला यांच्या बदलीची मागणी देखील केली होती. दरम्यान, सोमवारी (दि. ४) निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते. शुक्ला यांची बदली केल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here