मुंबादेवीच्या महायुती उमेदवार शायना एन.सी. यांच्या निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्‌घाटन

cm-eknath-shinde

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : मुंबईतील मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार शायना एन.सी. यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने जमलेल्या स्थानिक नागरिकांना संबोधित करताना या भागातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवायचा असेल तर महायुतीच्या उमेदवार शायना एन.सी. यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

 

मुंबादेवी हा मतदारसंघ आई मुंबादेवीच्या वास्तव्यामुळे पवित्र असा परिसर असून मुंबई शहराचे नावच या देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. याच मंदिर परिसराचा विकास महायुती सरकारने केला असून त्यासाठी २२० कोटी रुपयांची तरतूद केली असून भविष्यात येथे येण्यासाठी भाविकांना वाहतूक कोंडीत अडकून रहावे लागणार नाही असे नमूद केले.

 

मुंबईतील हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने येथे जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर आहे. मात्र रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाच्या सात यंत्रणांना एकत्रित करून हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावायला सुरुवात केली आहे. याच अंतर्गत घाटकोपर विभागातील रमाबाई आंबेडकर नगरचा पुनर्विकास एसआरए आणि एमएमआरडीए यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे येथील इमारतींचा पूर्णविकास देखील करता येईल तसेच शक्य असेल तिथे ठाण्याप्रमाणे क्लस्टर करता येईल असेही यासमयी अधोरेखित केले.

राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अडीच कोटी महिला भगिनींना झालेला आहे. आता या योजनेची रक्कम १५०० वरून २१०० रुपये प्रति महिना करण्याची घोषणा मी केली असून महिला भगिनींना त्यांच्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे करून त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला बचत गटाच्या उत्पादनांचे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करून त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक महिला ही लखपती व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगितले. लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण व्हावी यासाठी आम्ही २५ हजार महिला पोलिसांची भरती करणार आहोत. त्यामुळे महिलांना सक्षम करायचे तर विधानसभेत तुमचा आवाज बुलंद करणाऱ्या शायना एन.सी. यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन यावेळी मुंबादेवी विधानसभा मतदार क्षेत्रातील नागरिकांना केले.

यावेळी आमदार प्रा.मनीषा कायंदे, माजी आमदार अतुल शहा, शायना एन.सी. यांचे पती मनीष मुनोत तसेच दक्षिण मुंबईतील शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी – आरपीआय महायुतीचे सर्व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंबादेवी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here