उदयपुर (राजस्थान) : दिवाळीनंतर राजस्थानात पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक पर्यटक उदयपुरला येतात. या तलावांच्या शहराचे सर्वाधिक वेळा कॅमेऱ्यात छायाचित्रण केले जाते. विदेशी पर्यटकांच्या भारतभेटीत उदयपूरचे महत्व आहे. मात्र इथेच उदयपूरचे सौंदर्य टिपत असतांना एका विदेशी महिला पर्यटकाला गोळी मारण्यात आली. ती तिच्या मैत्रिणीसोबत हॉटेलकडे जात असताना अचानक कोणीतरी गोळीबार केला. या गोळीबारात या महिला पर्यटकाच्या पाठीत गोळी लागली आहे. जीव वाचला आहे पण प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, थायलंडची रहिवासी थानचैंग तिच्या मैत्रिणीसोबत उदयपुरला आली होती. दोघीही काही दिवसांपूर्वीच उदयपुरच्या पॉश कॉलनी मानल्या जाणाऱ्या माली कॉलनीतील वीर हॉटेलमध्ये राहत होत्या. काल रात्री दोघीही उशिरापर्यंत बाहेर होत्या आणि उदयपुरचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत होत्या. पण रात्री उशिरा हॉटेलकडे येत असताना कोणीतरी गोळीबार केला.
पोलिसांनी सांगितले की, रात्रीचा वेळ असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून फारशी मदत मिळालेली नाही. थानचैंगनेही गोळीबार करणाऱ्याचा चेहरा पाहिलेला नाही. तिच्या मैत्रिणीने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. आता पोलिसांसमोर भाषाविषयक समस्या येत आहे, त्यामुळे पोलिसांनाही पूर्ण माहिती मिळत नाहीये. थानचैंगच्या मोबाईलमधील सर्व नंबर थाई भाषेत आहेत.







