जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट झाले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी सुरु आहे. शहरात बोहरा गल्लीत गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास शनिपेठ पोलिसांनी एक पादचाऱ्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे २५ लाखांची रोकड मिळून आली.
जळगाव शहरातील पुष्पलता बेंडाळे चौकात गुरुवारी दुपारी शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.टी.धारबळे हे पथकासह तपासणी करीत होते. ११.३० वाजेच्या सुमारास सुभाष चौकाकडून पांडे चौकाकडे जात असलेली एक कार पोलिसांनी अडवली. वाहनाची तपासणी करताना त्यात २ कोटी ५३ लाख रोकड आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सर्व रक्कम आर.सी.बाफना ज्वेलर्स यांची होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी पडताळणी केल्यावर रोकडसह वाहन सोडून देण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.टी.धारबळे हे पथकासह सुभाष चौक, बोहरा गल्ली भागात गस्तीवर होते. एक व्यक्ती पायी निळ्या रंगाची बॅग घेऊन जात असताना त्याला पोलिसांना अडविले. बॅग तपासणी केली असताना त्यात २५ लाखांची रोकड मिळून आली. रोकडबाबत समर्पक उत्तर न देता आल्याने पथक संबंधित व्यक्तीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले.
अधिक चौकशी केली असता, संबंधित व्यक्तीने आपले नाव प्रमोद हिरामण पवार (वय-५१, रा.तामसवाडी) असे त्यांनी सांगितले. ते ना.शि.मंडळाचे हायस्कूल येथे वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत असून सोने घेण्यासाठी जळगाव आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.







