मुक्ताईनगर (संपादक सुनिल पाटील) : तालुक्यातील उचंदा येथे जन आशिर्वाद रॅली काढून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी तर्फे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीचा समारोप कॉर्नर सभेने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी रॅलीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांचे हर्षोल्हासात स्वागत केले.
यावेळी कॉर्नर सभेत बोलताना तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर यांनी गेल्या निवडणुकीत आम्ही शरद पवार साहेबांच्या आदेशाने विद्यमान लोकप्रतिनिधींना निवडून दिले परंतु त्यांनी आमचा भ्रमनिरास केला शरद पवार यांची साथ सोडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा साथ सोडली गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सर्वत्र भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सुरु असल्याचे सांगुन मतदार संघाच्या विकासासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी विशाल महाराज खोले यांनी मतदारांशी संवाद साधताना, राज्यात जाती धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु हा संतांचा महाराष्ट्र असुन कट कारस्थानाना बळी पडणारा नाही तेच चित्र आपल्या मतदारसंघांत सुद्धा आहे परंतु मतदारसंघाची शांतता टिकवायची आहे. आपल्या मतदारसंघांत साडी वाटप करून माता भगिनींचे मत विकत घेण्याचा प्रयत्न झाला परंतु खोट्या आमिषाला बळी पडू नका आपल्या भगिनी रोहिणी खडसे यांना विजयी करा असे आवाहन केले.
याप्रसंगी विनोद तराळ यांनी मार्गदर्शन करताना आपला परिसर हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर असून शेत रस्त्यांची समस्या आहे, पुनर्वसनाची कामे बाकी राहिली आहेत ते रोहिणीताई खडसे या निश्चित सोडवतील अशी ग्रामस्थांना ग्वाही देऊन रोहिणी खडसे यांना गावातून मताधिक्य देण्याची विनंती केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटिल, पवनराजे पाटिल, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते मनोहर खैरनार, अविनाश पाटील, निलेश पाटील, विकास पाटील,रामभाऊ पाटील, माणिकराव पाटिल, साहेबराव पाटील, साहेबराव धनगर, किरण तायडे, राजेंद्र भोलाने,सद्दाम शेख आणि ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.







